वाटेवरती लटपटताना आधाराचा भक्कम हात....
वाटेवरती लटपटताना आधाराचा भक्कम हात….
‘चाइल्ड लाईन से दोस्ती’ या कार्यक्रमात चाइल्ड लाईन टीम व्यस्त असताना कॉल आला; “मला वाचवा, मी घरून निघून आले आहे. मला सकाळी फास लावून मारून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मला घरचे शोधत आहेत. मला वाचवा.” एका मुलीचा प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत रडत रडत कॉल आला होता.
कार्यकर्त्यांनी तिला धीर दिला. टीम पोहोचेपर्यंत तू जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जा असे सांगितले. पटापट सूत्र हलली आणि चाईल्ड लाईन टीम तातडीने भुसावळला रवाना झाली.
सांगितल्याप्रमाणे पोलीसस्टेशनमधे आश्रय घेतलेल्या त्या मुलीची भेट झाली. मुलीची अवस्था पाहून परिस्थितीचे गांभीर्य कळाले. मुलीच्या मानेभोवती गळा आवळल्याचे व्रण होते. हातापायाला भरपूर मारल्याच्या खुणा होत्या. गुप्तांगावर मारल्याने मुलीला धड चालताही येत नव्हते. गेल्या दोन-तीन दिवसापासून उपाशी ठेवण्यात आले होते.
टीमने मुलीच्या नाश्त्याची व्यवस्था केली. ताबडतोब जळगाव येथील मुलींच्या बालगृहात तिला दाखल करण्यात आले. तिथे उपचारही सुरू झाले.एवढ्या मोठ्या मानसिक धक्क्यातून तिला बाहेर काढणं आवश्यक होतं. नियमित समुपदेशनामुळे तिचा आत्मविश्वास वाढू लागला. आठ-दहा दिवसात तिची तब्येत सुधारून चांगली दिसू लागली.
आता तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला हात देणे गरजेचे होते.ती१२वी कॉमर्स मध्ये शिकत होती. या व्यतिरिक्त तिला बॉक्सिंग मध्ये आवड असून अनेक स्पर्धेत सहभाग घेतल्याचे कळाले. चाईल्ड लाईनच्या प्रयत्नाने तिचा बारावीचा परीक्षा फॉर्म भरून पुस्तके, वह्या पुरविण्यात आले. तिनेही संधीचा फायदा घेऊन कमी वेळेत अभ्यास पूर्ण केला आणि बालगृहात राहूनही बारावीच्या परीक्षेत 66 %गुणांनी ती उत्तीर्णही झाली.
आता पुढे काय?
तिने सांगितले,”आता मला घरी जायचे नाही. पुढे शिकून माझ्यासारख्या मुलींसाठी मला कार्य करायचे आहे.”
एक मिणमिणणारी पणती अनेक पणत्या उजळून टाकायला सरसावली होती!
चाईल्ड लाईनच्या प्रयत्नांतून अशा अंधारात चाचपडणाऱ्या कितीतरी मुलांना उजेडाची वाट सापडू शकते!
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान