हारी बाजी को जीतना हमें आता है...

“तुषार लहानपणापासून कायम चिडचिड करायचा, कधी कधी तर हिंसकही व्हायचा. आश्रय-माझे घर ला आल्यापासून खूप निवळलाय, शहाणा झालाय. परवा तर त्याने चक्क शुभंकरला त्याचं नाव लिहायला शिकवलं म्हणे! व्यवस्थापकांनी फोटो पाठवला होता त्याचा शिकवतांना. मला इतकं बरं वाटलं! आई-वडिलां विना पोर… आम्ही दोन मावश्या असतांनाही वय झाल्यामुळे त्याला सांभाळू शकलो नाही, त्याला इथे ठेवावं लागलं, खूप अपराधी वाटत होतं. पण त्याची प्रगती पाहून आमचा त्याला आश्रयाला ठेवण्याचा निर्णय अगदी योग्य होता ह्याचं समाधान झालं!” तुषारची मावशी सांगत होती…

“आमच्या आदित्यला गेल्या अनेक वर्षांपासून दम्याचा त्रास होता. इथे आल्यापासून जणू काही जादूच झालीय, त्याचा दमा पूर्णपणे बरा झालाय!”… आदित्यची आई म्हणाली.

“इथे राहून मुलांचे आजारही बरे होतात आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्यही सुधारतं. ती कायम आनंदात असतात. आज माझ्या लेकाने मी आणलेली खाऊची पिशवी घेतली आणि मला म्हणाला, आता तू तुझ्या घरी जा, मी इथेच माझ्या घरी राहाणारे”, शुभंकरची आई सांगायला लागली.प्रौढ मतिमंदांचा आजीवन सांभाळ करणार्‍या ‘आश्रय – माझे घर’च्या पालकसभेला आलेल्या ह्या माउल्या… तिघींच्या चेहर्‍यावर समाधान विलसत होतं…

आई वडिलांपासून, भावडांपासून, आपल्या माणसांपासून लांब राहूनही एवढा सकारात्मक बदल घडण्याचं कारण त्यांना इथे त्यांच्याच सारखे, त्यांना समजून घेणारे सवंगडी मिळतात, त्यांची मैत्री होते. मग एकमेकांच्या नादाने ते पणत्या रंगवतात, राख्या तयार करतात, उदबत्त्या बनवतात, एकत्र व्यायाम करतात, क्रिकेट खेळतात, बास्केटबॉल खेळतात, गाण्यांच्या तालावर नाचतात आणि म्हणतात…

नहीं समझे जो वो हमें, तो क्या जाता है,
हारी बाजी को जीतना हमें आता है!

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *