तिच्या असाह्य हृदय वेदनांना सुढृद्ध भविष्य लाभले....
“हृदयस्थ”
दुसर्यांच्या शेतात मजुरी करणार्या दांपत्याच्या पोटी आलेली कन्या. तिच्या सततच्या आजारपणाचे कारण कळले तेंव्हा मायबाप दोघेही कोसळून गेले.
मुलीच्या हृदयाला छिद्र होते.
चार महिन्याच्या मुलीला घेवून अनेक दवाखाने पालथे घातले. अनेक नामांकित डॉक्टरांना भेटले. छोट्यामोठ्या उपचारात जवळची पुंजी संपली. आता काय करायचे ? आईबापाचे आतडे तीळ तीळ तुटत होते, ते मनोमन देवाजवळ प्रार्थना करत होते. पण त्यांच्या हाती उरले होते फक्त ‘तिच्या’ वेदनांकडे असाह्यापणे पाहत बसणे.
आईवडिलांची मनोमन प्रार्थना देवपर्यंत पोहोचली असावी. त्यांना कुणीतरी, ‘केशवस्मृती प्रतिष्ठानच्या चाइल्ड लाइन’ ची माहिती सांगितली. मुलीच्या वडिलांनी तत्काळ संपर्क केला. मुलीचे सर्व रिपोर्ट मुंबईला पाठवले गेले.
पुढची हालचाल युद्ध पातळीवर करण्यात आली. मुंबई, खरघर येथील सत्यासाई हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करण्यात आले. त्यावेळी कदाचित मुलीला ‘पेसमेकर’ बसवावा लागेल अशी शक्यता होती. त्यावेळी लागणारा 2 ते 2.5 लाख खर्च कुठून आणायचा असा प्रश्न मुलीच्या आईवडिलांच्या समोर होता. पण डॉक्टरांच्या कौशल्यामुळे ‘पेसमेकर’ची गरज लागली नाही.
ऑपरेशन यशस्वी झाले. आई वडिलांची प्रार्थना आणि कार्यकर्त्यांची मेहनत फळाला आली. जन्मदात्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अत्यंत भावोत्कट वातावरणात त्या गोड मुलीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज ती मुलगी हसत खेळत आहे. ‘केशवस्मृती प्रतिष्ठानच्या चाइल्ड लाइन’मुळे ‘त्या’ कन्येच्या आयुष्याला सुढृद्ध भविष्य लाभले आहे.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान