त्यांच्या डोळ्यांनी जग बघुया...
“दुर्दैवाने हा वाचला नाही पण याच्या नेत्रदानाने तरी हा जिवंत राहील.” हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी ९ वर्षाच्या नीलच्या आई, वडिलांना सांगितले आणि फार विचार न करता त्याचे अस्तित्व किमान त्या रूपाने राहील म्हणून त्यांनी नेत्रदानाला परवानगी दिली.
नऊ वर्षाच्या नीलच्या डोक्यात खेळताना लोखंडी दरवाजा पडला खूप रक्तस्त्राव झाला. धावपळीत त्याला जवळच्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. न्यूरोसर्जननी परिस्थिती बघून तातडीने केलेली शस्त्रक्रिया देखील त्याला वाचवू शकली नाही. आनंदाने चाललेल्या संसारावर दु:खाचा डोंगर कोसळला. आयुष्य अजून ज्याने बघितलेच नव्हते त्याचे डोळे कायमचे बंद झाले होते. जवळच उभ्या असलेल्या डॉक्टरांना माणसाचे मरण नवीन नव्हते, पण अशा कोवळ्या वयातील मृत्यू त्यालाही आतून हलवून गेला. त्यामुळे न कळत त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले“ दुर्दैवाने हा वाचला नाही पण याच्या नेत्रदानाने तरी हा जिवंत राहील.” जळगावमधील एकमेव नेत्रपेढी असल्याची माहिती त्यांना होती. नेत्रपेढीतील तंत्रज्ञांनी लगेचच नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली आणि पुढच्या दहा दिवसातच दोघांना त्याचे नेत्रपटल लावण्यात आले आणि त्यांच्या डोळ्यांनी नील पुन्हा जग बघू लागला.
नेत्रपेढीच्या रौप्य महोत्सवी वर्षापर्यंतच्या वाटचालीची यशस्विता म्हणजे नेत्रदान केले पाहिजे असे सांगणारा डॉक्टरी समुदाय आणि त्यापेक्षाही वयस्करांबरोबरच नील सारख्या कोवळ्या वयात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या आई वडिलांना डोळे दान करण्याची प्रेरणा देणारा विश्वास. अनंताच्या पलिकडे जाऊनही अस्तित्व उराव, आपल्या डोळ्यांनी कुणीतरी जग बघाव, या भूमिकेतून आज असे असंख्य जीव मृत्यू पावून देखील त्यांच्या डोळ्यांनी जग बघत आहेत.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान