घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे...

“सर, ही नववीच्या वर्गाची पुस्तके पुस्तकपेढीत द्यायची आहेत. मला या वर्षी दहावीची पुस्तके पाहिजेत.” रुपेश पुस्तक पेढीतील सहकाऱ्याला म्हणाला. “अरे पण तू तर मागील वर्षी पुस्तक घेतली नव्हतीस?”. “हो ही माझ्या कडील आहेत. या बदल्यात मला यावर्षीची पुस्तके द्या.”

दरवषी नाममात्र शुल्कात ९वी ते १२वी च्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना केशवस्मृतीच्या ‘आम्हालाही शिकायचे आहे’ या उपक्रमांतर्गत पुस्तके दिली जातात. रुपेश मागीलवर्षी पुस्तकांसाठी येऊन गेला होता. त्यावेळी उशीर झाल्याने त्याला पुस्तके मिळाली नव्हती पण या उपक्रमाची माहिती कळली होती. शाळा सुरु होत असल्याने त्याने नवीन पुस्तके विकत घेतली आणि वर्ष संपल्यावर मात्र लवकरच ती पुस्तके घेऊन तो कार्यालयात आला. त्याची १० वीची पुस्तके त्याला मिळाली. बोलताना लक्षात आले त्याच्या घरची आर्थिक स्थिती अगदीच बेताची होती. वडील शिवाजी नगर भागात पंक्चर टायर दुरुस्त करायचे. तोच एक उत्पन्नाचा मार्ग होता. मागील वर्षाची पुस्तके अन्य कुठे विकून या वर्षीसाठी तो पुस्तक पेढीतून कमी शुल्कात पुस्तके घेऊ शकला असता. पण या कामाची पुण्याई अशी की त्याला देखील आपली पुस्तके इथेच देऊन आपल्याही काही समिधा या सेवा यज्ञात टाकाव्याश्या वाटल्या.

केशवस्मृतीच्या वाटचालीत नियमित काम करणाऱ्यांकडे बघत संपर्कात येणाऱ्यांनी ती प्रेरणा घेऊन या सामाजिक कामात सहभागी व्हावे असे अनेक वेळा झाले आहे. पण रुपेश सारखा सेवा घेणाराच जेव्हा सेवेचा मापदंड बनतो तेव्हा त्या सेवेच्या सुगंधाचा दरवळ अधिक नितळतेने सर्वत्र पसरतो. विंदा करंदीकरांच्या “देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे…” या ओळींची नकळतपणे प्रचिती येऊन जाते.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *