। । मूठभर अन्न आणि आभाळभर माया । ।
आपल्या मनामध्ये उच्च ध्येय ठेवून शिक्षण घेण्यासाठी भूषण जळगावमध्ये येतो. त्याची मनाची भूक भागवण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवतो. पण पोटाची भूक मात्र अस्वस्थ करून जाते.
घरची बेताची परिस्थिती त्यामुळे शिक्षणासाठी कसेबसे मिळणारे आर्थिक पाठबळ ओठाची आणि पोटाची गाठभेट घालण्यासाठी तुटपुंजे असते. अर्धपोटी दिवस काढत असताना भूषणला ‘केशव स्मृती संचलित क्षुधाशांती केंद्रा’ची माहिती कळाली. थोडे तेही आजमावून पाहू म्हणून त्याची पावले क्षुधाशांती केंद्राकडे वळतात. त्याच्या लक्षात येते की, इथल्या अन्नाची किंमत खिशाला परवडतेच पण इथल्या पोळी भाजीला आपलेपणाची चव आहे.
तिथे पोटाची भूक निवली आणि उच्च ध्येय गाठण्याची भूक वृद्धिंगत होत गेली.
कालचा भूषण आज उच्च विद्याविभूषित डॉ. भूषण राजपूत झाले आहेत. विद्यावाचस्पती (Doctorate) डॉ. भूषण राजपूत आता अशाच ध्येयावेड्यांच्या वाटेवरचे मार्गदर्शक आहेत. नवोदितांच्या डोळ्यात भव्यदिव्य स्वप्नांची रुजुवात करतांना डॉ. भूषण यांच्या डोळ्यात मात्र आजही केशव स्मृती संचलित क्षुधाशांती केंद्रसाठी अपार कृतज्ञतेचे भाव पाहायला मिळतात.
ते म्हणतात “ह्या क्षुधाशांती केंद्राच्या सात्विक अन्नामुळे माझे मनही सकस झाले. त्यातून आयुष्याकडे पहाण्याचे नवे आयाम विकसित होत गेले.”
आज या केंद्राला तीस वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या तीस वर्षात हजारो लोकांच्या पोटाची खळगी भरताना त्यांच्यावर आयुष्यभराची आभाळभर माया सुद्धा या केंद्राने सढळ हस्ते उधळून टाकली आहे.
तन की भूख सहज है तीन पाव की सेर ।
मन की भूख अनन्त है, निगलै मेरु सुमेर । ।
शरीराची भूक ही साधारण असते, ती किलो पाव किलोमध्ये मिटते
पण मनाची भूक अनन्य साधारण असते ती कदाचित मेरू पर्वत सुद्धा गिळून टाकू शकते.
अशी मनाची भूक सुद्धा योग्यरीतीने भागवण्याचे पुण्यकर्म हे क्षुधाशांती केंद्रातून होते आहे. अगदी सहजपणे…!
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान