आणि कळ्या उमलू लागल्या...

२००७ साली नीता, श्रवण विकास केंद्रात शिक्षक म्हणून रुजू झाली आणि मुख्याध्यापक आणि संचालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. दहा वर्षाच्या तिच्या अथक प्रयत्नांना आता यश आले होते. आयुष्याची वेगळी वाट तिच्यासमोर उभी राहिली होती.

मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या घरात जन्मलेल्या, लौकिकार्थाने अपंग असलेल्या बाळाचे पुढे काय करायचे असा यक्ष प्रश्न त्या बाळाच्या आई बापाला पडतो, आणि त्यात ती मुलगी असेल तर… ढाकेंच्या घरात जन्मलेल्या निताचे देखील असेच झाले. कर्णबधीर असलेल्या या मुलीचे पुढे कसे होणार या काळजीत तिचे १० वी पर्यंतचे शिक्षण तर पूर्ण झाले पण वयाच्या या टप्प्यावर आवश्यक असणारी किमान गुणवत्ता मात्र तिच्यात आली नाही. कुठून तरी माहिती मिळाल्याने खूप अपेक्षेने त्यांनी विवेकानंद प्रतिष्ठानचे कर्ण बधीर विद्यालय, श्रवण विकास मंदिर, गाठले. शिक्षकांची मेहनत आणि पुढे जाण्यासाठी काहीतरी करण्याचा तिचा आत्मविश्वास, जिद्द यातून तिने BA, Teacher Training Course, C.T.C., DTP कोर्स, मराठी-इंग्रजी टायपिंग पूर्ण केले आणि त्याच शाळेत हस्तकला व शिवण शिक्षिका म्हणून सेवा देण्यास सिद्ध झाली.

स्वत:च्या अनुभवातून शिकलेली नीता शाळेतल्या कर्णबधीर मुलांच्या भावविश्वात समरस होऊन आज ज्ञानदानाचे काम करीत आहे. प्रतिष्ठानच्या या शाळेमुळे अशा अनेक नीता स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेतच. पण सुरवातीला आप्तस्वकीय आणि कालांतराने समाजाची सुद्धा चिंता बनलेल्या या कळ्यादेखील आपल्यातील अपंगत्वावर मात करत उमलू शकतात हा आत्मविश्वास त्यांच्या कृतीने प्रस्थापित केला आहे.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *