सूर्य सत्याचा उद्या उगवेल...

‘काका तुम्ही रडू नका,तुम्हीच खचले तर कसं होईल…? आत्ता माझी सोय झाली, इथे मी आनंदाने राहीन… सगळी व्यवस्था छान आहे, माझी काळजी घ्यायला सर आणि केअरटेकर दादा आहेत तुम्ही काळजी करू नका…’ आश्रय-माझे घर मधून बाहेर पडतांना डोळ्यातून पाणी येणाऱ्या आपल्या ८० वर्षाच्या काकांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत विकास त्यांना आपल्या अडखळणाऱ्या पण हळुवार आवाजात सांगत होता.

वडील लहानपणीच गेलेले आणि काही महिन्यापूर्वीच आई गेल्यामुळे एका अर्थाने पोरक्या झालेल्या आपल्या ३३ वर्षाच्या मतीमंद पुतण्याचे पुढे कसे होणार या काळजीने वसंतरावांचा जीव तुटत होता. त्यांचेही आता वय झाले होते. कमी दिसणाऱ्या विकासाला फिट येत असतं.अनेक वेळा तो असा फिट येऊन घरात पडला होता. त्यामुळे कोणीतरी त्याच्याकडे लक्ष देणारे हवे होते. देवाचा न्याय देखील अजब होता. हे सर्व असून देखील त्याला बोलता मात्र चांगले येत होते. स्वत:च्या अडचणीची आणि आपल्यामुळे काकांच्या होणाऱ्या तगमगीची त्याला जाणीव होती. आई गेल्यावर एकटा असलेल्या विकास बरोबर देखभालीसाठी काका राहिले. मात्र त्यानाही वयाच्या या टप्प्यावर त्याला सांभाळणे अवघड होते. कुठूनतरी आश्रयची माहिती मिळालेल्या वसंतरावांनी एक दिवस तिथे मुक्काम केल्यावर मात्र त्याची विकासाच्या पुढील आयुष्याबद्लची चिंता मिटली.

भोवताली दाटला अंधार दु:खाचा जरी… सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी… कवितेच्या या ओळीप्रमाणे कितीही दु:ख असले तरीही उद्याचा दिवस निश्चितच चांगला उगवणार आहे. या आशेच्या बळावर आपले आयुष्य कंठणाऱ्या विकास सारखी अनेक मतीमंद मुले आणि वसंतरावांसारख्या पालकांच्या आयुष्यात ‘आश्रय-माझे घर’ हा मतीमंद मुलांचा आजीवन निवारा असलेला प्रकल्प, जगण्याची उमेद घेऊन कार्यरत आहे.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *