जीवन त्यांना कळले हो...

“सर… आता गावात जायला गाडी किती वाजता मिळेल… घरी जायचे ठरवले आहे” सकाळी उठल्या उठल्या सावजींनी वृद्धाश्रमातील व्यवस्थापकांना विचारले आणि अचानक काय झाले हे न कळल्याने व्यवस्थापक देखील गडबडले.

पोलीस दलातून निरीक्षक म्हणून निवृत्त झाल्यावर घरी निवांत राहणे सावजींना कठीण जाऊन लागले. आपल्याच शिस्तीच्या आणि घड्याळाच्या काट्यावर स्वत:ची कामे करून घेण्याची सवय असलेल्या सावजींना, सुना नातवंडे असलेल्या घरात आता , निवृत्तीनंतर घरातले आपल्याकडे लक्ष देत नाहीत असे वाटू लागले होते. आपल्या भोवतीच सर्व काही फिरविण्याची सवय असलेल्या त्यांना आपण बाजूला फेकले गेलोय असे वाटायला लागले होते, त्यातूनच त्यांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला होता. आता दहा दिवस झाले होते. निवासाच्या खिडकीतून दिसणाऱ्या घंटेचा आवाज आता त्यांना त्रास द्यायला लागला होता. इथेही माझ्या मनाप्रमाणे राहता येत नाही उठणे, चहा, जेवण सर्वकाही घंटा सांगते. व्यवस्थापकांच्या कानावर हे त्यांनी घातल्यावर अहो आता आपले आयुष्य मध्यवर्ती न राहता समूहाच्या व्यवस्थेतच राहते. हा वृद्धाश्रम आहे, याचेही काही नियम आहेत तुम्हाला थोडे जुळवून घ्यावे लागेल. काही तरी गवसल्यासारखे सावजी आपल्या वृद्धाश्रमातील खोलीकडे परतले.

सकाळी लवकर जागे झालेल्या सावजींना खूप मोकळे वाटत होते. कुठेही राहिलो तरी त्या प्रत्येक व्यवस्थेची बंधने असणारच. नोकरीतल्या आपल्या साहेबीपणातच आपण आता राहू शकत नाही हा साक्षात्कार त्यांना वृद्धाश्रमातील शिस्तीने झाला. ‘मी पण माझे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो… जीवन त्यांना कळले हो…’ बोरकरांच्या या कवितेतील आशयाप्रमाणे त्यांचा स्वत:भोवतीच सर्वांनी फिरण्याचा अहंभाव गळून कधी एकदा कुटुंबात जाऊ या ओढीने त्यांनी सामानाची बांधाबांध सुरु केली.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *