देश हमें देता है सब कुछ,
हम भी तो कुछ देना सीखें...
दर दिवशी वृत्तपत्र, दूरचित्रवाणी, आजूबाजूला होणाऱ्या नकारात्मक चर्चा हे सर्व बघितल्यावर सर्वत्र वाईटच सुरु आहे. असा भास होतो. थोडा विचार केल्यावर मात्र लक्षात येते की भवताली इतके वाईट असेल तर आपण जगूच शकणार नाही. मात्र आजही काहीजण असे आहेत जे समाजात आनंदाची, सकारात्मकतेची पाखरण करत राहतात.आपल्या कृतीने समाजातील प्रश्नांची उत्तरे काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कामाचा सुगंध वाईटाच्या दुर्गंधीवर मात करत समाजात दरवळत राहतो. आपल्या कृतीने या व्यक्ती, संस्था माणुसकीचा, संवेदनेचा, ममत्वाचा झरा समाजरूपी मंदिर पवित्र व्हावे म्हणून आपल्यापरीने काम करत आहेत. त्यामुळेच समाजात आजही सेवेचा दीप उजळलेला दिसतो. अशा संस्था आणि व्यक्तींची सेवा ही निरंतर चालणारी अविनाशी असते, त्या सेवेचा सन्मान करण्यासाठी प्रतिष्ठानने अविनाशी सेवा पुरस्कार देण्याचे ठरविले. या वर्षीचा हा आठवा पुरस्कार ठाणे येथील श्री. रवींद्र कर्वे व संभाजीनगर येथील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाला देण्यात आला.
प्राशुनी हलाहल सारे… बांधून संकटे पायी, चालतो ध्येय पथ आम्ही… वाटू द्या कुणाला काही… या वृत्तीने काम करणाऱ्या अशा संस्थांच्या कामातून आपण देखील हा संस्कार समाजात रुजविण्याचा प्रयत्न करूया. आपल्या क्षमतेनुसार समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करण्याची भावना रुजाविण्यासाठीचा हा खटाटोप…
देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें…
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान