पुण्यवान मरणयात्रा

सकाळी सकाळी आमदाराच्या घरासमोर काही जण उभे होते. साहेब कुठल्या तरी कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले होते. बाहेरच्या माणसांना बघून त्यांनी विचारले काय रे काय झाले? दबकतच घोळक्यातल्या एकाने सांगितले भाऊ, अंत्यविधीसाठी स्मशानात लाकडे पाहिजे होती, चार हजार लागतील, असे तिथल्या माणसाने सांगितले. आमदार साहेबांना आता हे नेहमीचेच झाले होते. अंत्यविधीच्या लाकडाचा खर्च देखील परवडू न शकणाऱ्या अशा अनेकांना गावातल्या आमदार, नगरसेवक अन्य प्रतिष्ठित माणसे यांच्या कडून बऱ्याच वेळा पैसे घ्यावे लागत. स्मशानात गेल्यावर लाकडांव्यतिरिक्त तिथल्या कर्मचाऱ्याने ऐनवेळी सांगितलेले पैसे अंत्यविधीला आलेला कुणीतरी नातेवाईक देत असे. पैशाबरोबरच होणारी अंत्यविधीला लागणाऱ्या झाडांची हानी देखील खूप होती.
अंत्यसंस्कारासाठी कमी पैशात, मरणाऱ्या माणसासाठी झाडांचा जीव वाचविणाऱ्या गॅसदाहिनी केल्यास आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता होईल असे रिखभराज बाफना यांना नेहमी वाटत असे. कल्पना मांडणे चांगले पण ती पूर्ण कोण करेल याचा त्यांचा शोध केशवस्मृती जवळ येऊन थांबला. ‘जिथे कमी तेथे आम्ही’ या न्यायाने केशवस्मृतीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानात गॅसदाहिनी बसविण्याचे हे आव्हान स्वीकारले. बांधकाम करताना देणगी मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त खर्च येईल हे लक्षात आल्यावर प्रतिष्ठानच्या दिलीप चोपडांनी तो खर्च उभा करून दिला आणि जिल्ह्यातील पहिली गॅसदाहिनी तयार झाली. अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांना बसण्याबरोबरच स्वच्छतेची चांगली व्यवस्था उभी राहिली.

आज केवळ ३००० रुपयात अन्य कोणताही वरखर्च न लागता अंत्यविधी होऊ लागला आहे. या दुःखाच्या वेळी आता कोणाकडे हात पसरण्याची गरज राहिली नाही. महत्वाचे म्हणजे आजपर्यंत ४०० झाडांची कत्तल थांबली. केवळ पैसे नव्हे तर निसर्ग संवर्धनाचे काम या गॅसदाहिनीमुळे सुरु झाले. देवाघरी जाणाऱ्या माणसांची मरणयात्रा अधिक पुण्यवान झाली.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *