कुणी न राहो दुबळा येथे
मनी असा निर्धार करू
‘तुम्ही देव माणसं आहात.’ आपल्या लहान मुलाच्या गळ्यात पडून रडताना बाबा म्हणाले. रागाने घराबाहेर पडलेल्या वडिलांना बऱ्याच दिवसांनी बघितल्याने मुलाला देखील खूप आनंद झाला होता.
घरातली नेहमीची भांडणे.मोठ्या मुलाने नेहमी दारू पिऊन यायचे आणि आई बापाला शिव्या देत बसायचे. याचा गणपतरावांना खूप कंटाळा आला होता.लहान मुलगा या सर्वाला कंटाळून बायकोला घेऊन दुसरीकडे रहायला गेला होता. एके दिवशीच्या भांडणानंतर रागारागाने बाबा घराबाहेर पडले. जळगाव स्टेशन परिसरात असलेल्या लॉज वर राहिले. तीन चार दिवसात खिशातले हजार रुपये संपले. आत काय करायचे? बाबाना काही समजेना.अभिमानी असल्याने भिक मागून खाता येत नाही. घरी, नातेवाईकांकडे जायचे नाही अशा अवस्थेत आत्महत्येचा विचार मनात घोळवत रेल्वे स्टेशनवर विमनस्क अवस्थेत फिरताना त्याना समतोलच्या कार्यकर्त्यांनी बघितले. हरलेल्या, बिथरलेल्या लहान मुलांना ओळखण्याची सवय लागलेल्या प्रदीप आणि विश्वजितला हे प्रकरण वेगळे असल्याचे तत्काळ जाणवले. बाबांना बालसुरक्षा कक्षात नेऊन त्यांची विचारपूस केल्यावर परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्याही लक्षात आले. तातडीने त्यांनी बेघर निवारा गृहाशी संपर्क करून त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करून दिली. दोन दिवसात स्थिरावलेल्या बाबांशी बोलत राहून त्यांची घरी जाण्याची मनस्थिती बनवली. या दरम्यानच्या काळात त्यांच्या घरच्यांशी संपर्क करून त्यांना जळगावला बोलविण्यात आले. मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मुलगा आईला घेऊन बाबांना घ्यायला आला. आपला तुटलेला परिवार पुन्हा परत मिळाल्याचा आनंद बाबांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांच्या दोन्ही डोळ्यातील पाणी मात्र थांबत नव्हते.कार्यकर्त्यांनी सर्वांना तिळगुळ देऊन त्यांच्या आनंदाचा गोडवा वाढवला.
मुलांना शोधता शोधता दु:खी,अभागी आणि गरजू माणसांना ओळखण्याची नजर विकसित झालेल्या समतोलच्या कार्यकर्त्यानी आता ‘कुणी न राहो दुबळा येथे मनी असा निर्धार करू’ या भावनेने रेल्वे स्टेशनवर कोणीही गरजू आबालवृद्ध आता अगतिक आणि केविलवाण्या अवस्थेत राहणार नाही, हे ठरविले आहे.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान