.... आणि तिचा संसार सुरू झाला
‘ति’चा आणि त्याचा सुखाचा संसार सुरू होता. पण ऐन तारुण्यात पत्नीची दृष्टी हळू हळू कमी होत गेली आणि आलेल्या आंधळेपणाने जीवनात आणि जवळच्या नात्यातही अंधार पसरला. दृष्टिहीन पत्नीला, पतीने माहेरी सोडून दिले.
‘ती’ अभागी महिला माहेरी कुणी संगितले म्हणून डोळ्यांच्या उपचारासाठी जळगावात संबधित डॉक्टरांचा पत्ता शोधत होती. पण नियतीने मांगीलालजी बाफना नेत्रपेढीत आणून पोहचवले. सर्व तपासण्या झाल्या आणि तिथल्या डॉक्टरांनी आश्वस्त केले की, ज्या क्षणी आमच्याकडे कोणाचे मरणोत्तर नेत्रदान होईल आम्ही तुम्हाला कळवू.
नियतीने पुन्हा एक सुखद धक्का दिला. संध्याकाळी कुणा पुण्यात्माचे मरणोत्तर नेत्रदान प्राप्त झाले. ‘त्या’ महिलेवर त्याचे सुयोग्य प्रत्यारोपण झाले. आश्चर्य म्हणजे पुढच्या काही तासातच ते डोळे तिच्या शरीराने स्वीकारले; आणि ‘ति’ला स्वच्छ दिसायला लागले.
नेत्रपेढीत ‘ती’ महिला दुसर्या कुणाचा तरी आधार घेत, चाचपडत आली होती. पण जातांना आत्मविश्वासाने पाऊले टाकत घरी पोहोचली. तिच्या सासरच्यांनी आणि पतीने आनंदाने तिला आपलेसे केले. तिला दृष्टी मिळाली घरच्यांचा दृष्टिकोन बदलला.
अंधाराच्या वाटेवर थांबलेला संसार उजेडाच्या दानाने पुन्हा सुरू झाला.
काल तिच्या डोळ्यात अंध:कार होता आज दोन प्रकाश ज्योती आहेत आणि त्यातून व्यक्त होणारी भविष्याची अगणित स्वप्ने …..
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान