जीव जगविण्याचे काम...

‘तुम्ही खरे सामाजिक काम करत आहात !’ तीन वर्षाच्या थॅलेसेमियाचा रुग्ण असलेल्या यशच्या वडिलांनी रक्तपेढीतील जनसंपर्क अधिकाऱ्याला सद्गद्दीत स्वरांनी सांगितले. या पुढे रक्तासाठी दमछाक होणार नाही या आशेने यशचे बाबा सुटकेचा निश्वास टाकून रक्तपेढीतून बाहेर पडले.

नोंदणी असलेल्या रक्त पेढीतून रक्त मिळाले नाही. O – निगेटिव्ह रक्त गट असलेली रक्त पिशवी मिळविण्यासाठी कासावीस झालेला एक बाप शेवटचा उपाय म्हणून माधवराव गोळवलकर रक्तपेढीत खूप आशेने आला होता. थॅलेसेमियाच्या रुग्णाला आवश्यक रक्त ठरलेल्या कालावधीत देणे गरजेचे असते. यशला ते रक्त वेळेत न मिळाल्याने त्याची स्थिती बिकट होती. नोंदणीत नसलेली व अचानक मागणी आल्यामुळे तिथल्या सहकाऱ्यांची धावपळ झाली. मात्र थोड्याच वेळात रक्ताबरोबर कधीही अडचण आली तर आमच्याकडून रक्त घेऊन जा असे आश्वासन देखील मिळाले. मुळातच रक्त दात्यांची संख्या कमी. त्यात निगेटिव्ह रक्त घटक असलेले दाते कमी. थॅलेसेमियाच्या रुग्णांना हे रक्त मोफत द्यायचे असते. त्यामुळे ते देण्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता. अशा वेळी आधीच आपल्या मुलाच्या आजारामुळे केविलवाणे झालेल्या पालकांना त्यासाठी रक्तपेढीत बऱ्याच वेळा विनवणी करावी लागते. रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांच्या दयेवर त्याच्या मुलाच्या आयुष्याच्या दोरीची लांबी ठरणार असते.

रक्तदान वाढविण्याबरोबरच निगेटिव्ह रक्तगटाच्या दात्यानी रक्तदान करण्याची गरज खूप आहे. विशेषत: थॅलेसेमिया सारख्या आजारातील मुलांसाठी या गटातील रक्तदात्यांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे होते. आज अशा ९० नोंदणीकृत बालकांबरोबरच कोणत्याही गरजूला तो आपल्याकडे नोंदणीकृत असो वा नसो हे जीव जगविण्याचे काम आहे या मनोभावनेने रक्तपेढीतील सहकारी रक्त देण्यास कार्यरत आहेत.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *