कानाने बहिरा मुका परी नाही,

शिकविता भाषा बोले असा काही...

२५ वर्षांपूर्वी, शाळेत प्रवेश घेतलेल्या साडेतीन वर्षाच्या, दिसायला कुपोषित असलेल्या विजयची अंगकाठी बघून आधीच कर्णबधीर असलेल्या या मुलाचे पुढे कसे होणार? या काळजीने मुख्याध्यापकांच्या डोक्यावर आठ्या आल्या, मात्र आज जलसंपदा विभागात कार्यरत असलेला, जिल्ह्याच्या मुकबधीर असोसिएशनच्या विविध जबाबदाऱ्या खंबीरपाणे सांभाळणारा विजय, विवेकानंद प्रतिष्ठानच्या, श्रवण विकास मंदिराचा अभिमान झाला आहे.

१९९५ साली सुरु झालेल्या श्रवण विकास मंदिरला (कर्ण बधिरांची शाळा) दहावीची पहिली तुकडी पास होण्यास २००५ साल उजाडले आणि बघता बघता केवळ शैक्षणिकच नव्हे तर कला, क्रीडा क्षेत्रात देखील महाराष्ट्रातील एक नामांकित शाळा म्हणून नावलौकिक मिळवला. ऐकू न येणाऱ्याला शिकवण्याबरोबरच त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल यासाठी शाळेने खूप प्रयत्न केले. आज महाराष्ट्रातील पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरातच उपलब्ध असलेली अत्याधुनिक स्पीच टेस्टिंग व थेरेपी लॅब शाळेने उभी केली आहे. आतापर्यंत मागील १७ वर्षात १३८ विद्यार्थी १० वी उत्तीर्ण होऊन खाजगी, शासकीय नोकरी बरोबर व्यवसाय करत स्वत:च्या पायावर उभे आहेत.

कानाने बहिरा मुका परी नाही,
शिकविता भाषा बोले असा काही
बिघाड हो त्याच्या केवळ कानात
वाचा इंद्रियात दोष नाही मुळी
जन सकलानो सत्य हेच जाणा,
मुक्याला बोलाया शिकवोनी पाही

काही वर्षापूर्वी मुंबई दूरदर्शनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात पोहोचलेल्या या अभंगाने कर्णबधीरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकला. त्याच्याकडे केवळ दया बुद्धीने न पाहता त्याला आयुष्याच्या लढाईतील एक सक्षम सैनिक बनविण्याचे काम आज श्रवण विकास मंदिराच्या माध्यमातून अविरत सुरु आहे.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *