सावित्रीच्या लेकी
‘मला या शिवणक्लासमुळे खूप शिकायला मिळाले .माझ्या पायावर उभे राहता आले.’ व्यासपीठावर पहिल्यांदाच बोलण्याचा अनुभव घेणाऱ्या रमाताईचा बोलता बोलता बांध फुटला आणि व्यासपीठावरच ती रडायला लागली. शिवणकाम अभ्यासक्रमाच्या बेसिक आणि अँडव्हान्स कोर्सच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ती अनुभवकथन करत होती.
घरातल्या एकत्र कुटुंबातील असंख्य अडचणींवर मात करून रमा चोरुनच शिवणक्लासला यायची. तिथे आलेल्या बाकीच्या तायांशी बोलून आपलं मन हलकं करायची. काहीतरी छोट्या कारणांनी भांडण काढून घरातील मोठ्यांनी रमा,तिचा नवरा आणि दोन लहान मुलांना भर पावसात घराबाहेर काढले. तीन दिवस पत्र्याच्या शेड मध्ये काढल्यावर ती भाड्याच्या घरात रहायला गेली. आता नवऱ्याला घर चालवायला हातभार लावला पाहिजे या जिद्दीने तिने मन लाऊन अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रात्यक्षिक परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. आयुष्यातील संघर्षाने तिला लढायची ताकद दिली होती. अभ्यासक्रम पूर्ण होताच तिने शिवणकाम करायला सुरवात केली आणि बघता बघता स्वत:च्या पायावर उभी राहिली. संसाराला तिचा मोठा आधार झाला.
केशवस्मृतीच्या सेवावस्ती विभागामार्फत विद्यापीठाच्या संल्गतेने सुरु केलेल्या शिवणकाम अभ्यासक्रमाने अशा अनेक रमा, कविता, गीता यांना स्वत:ची ओळख मिळवून दिली आहे. सावित्रीच्या या लेकी आता सबला बनत आहेत.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान