डोक्यावरचा पदर ते मानाचा फेटा...

महिला सबलीकरणाचा विषय कार्यकर्त्यांच्या मनात होताच.

केशव स्मृती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सेवावस्तीतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र ढोल ताशा लेझीम पथकाचा विचार केला.

सुरुवातीला वस्तीतून विरोध झाला पण हळूहळू रंगीत तालमीला रंग येऊ लागला.

एक दिवस रंगीत तालीम सुरू असताना पथकातील एका महिलेसमोर तीचे कर्मठ सासरे येऊन उभे राहिले.
आणि त्यांनी सुनबाईचा पदर डोक्यावरून खाली आला म्हणून चार लोकात तीची कान उघाडणी केली. ते म्हणाले, “डोक्यावर पदर टिकत नसेल तर कपाळावर खिळा ठोकून पदर घट्ट बांधून ठेवतो”. सासरे चार लोकात बोलल्याने त्या सुनबाईच्या डोळ्यात पाणी आले. दुःखी झालेल्या महिलेच्या डोळ्यात पाणी पाहून सर्व कार्यकर्त्यांना वाईट वाटले.

कार्यकर्त्यांनी धीर दिला आणि रंगीत तालीम पुढे सुरू राहिली.

वर्षप्रतिपदेच्या दिवस उगवला. स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. वस्तीतील घरासमोर सडा रांगोळ्या फुलापानांची तोरणांनी पथकाचे स्वागत होणार होते.

सर्व पथकातील महिलांना भगवे फेटे बांधण्यात आले. सूर्याने आपल्या पहिल्या किरणांनी भूमीला स्पर्श करताच पथकाचे सुश्राव्य संचलन सुरू झाले.

संचलन एकदम दिमाखदार झाले. संचलनाच्या शेवटच्या टप्प्यात ते कर्मठ सासरे पुन्हा आपल्या सुनबाई समोर आले. सुनबाईला थोडा धक्का बसला पण ती काही म्हणण्याच्या आत ते सासरे म्हणाले “सुनबाई हा फेटा तुला खूप शोभून दिसतो म्हणून मी आता तुझ्या बरोबर एक फोटो काढतो”.

सुनबाईच्या डोळ्यात अश्रु तरळले पण आता ते आनंदाचे अश्रू होते.

शोभायात्रेत सहज म्हणून बांधलेला फेटा सासऱ्यांच्या कौतुकाने मानाचा फेटा झाला होता.

कार्यकर्त्यांची महिला सक्षमीकरणाची मेहनत काही अंशी फळाला आली होती.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *