गरजूंची भूक भागविण्याचे व्रत...

‘आम्ही कोठूनही आलो तरी, गाडी बस आगारात लावल्यावर, जेवायला क्षुधा शांतीतच येतो. घरची चव मिळते साहेब येथे. कोरोनाच्या काळात अडचण झाली होती पण आता पुन्हा आमचे येथे येणे सुरु झाले आहे’. श्री क्षुधा शांती सेवा संस्थेच्या शेजारी असलेल्या जळगाव मध्यवर्ती बस आगारातील एक बस वाहक कोरोना नंतर सांगत होता.

जळगाव हे तसे ग्रामीण अर्थव्यवस्था असलेल्या जिल्हा केंद्राचे गाव. जिल्हा रुग्णालयात, कोर्ट कचेरी, लग्नाच्या बस्त्या पासून ते सणासुदीच्या कपडे आणि सोने खरेदीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी,लहान व्यावसाईक,नोकरदारवर्ग जळगावात येतात. दिवसभर आपली कामे आटपून संध्याकाळी आपापल्या गावी परततात. या सर्वांची आणि शहरातील गरजूंची कमी पैशात पोटभर घरच्या चवीच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून १९९२ साली दोन रुपयात झुणका भाकरने सुरवात झाली आणि बघता बघता खान्देशी चवीचे पोटभर अन्न मिळणारे शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून त्याची ओळख केवळ उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाली.स्थानिक माध्यमांबरोबर राष्ट्रीय दूरचित्रवाणी माध्यमांनी देखील त्याची दखल घेतली.

पैसे घेऊन पोटभर जेवणाची व्यवस्था करणे असा हॉटेल चा धंदा न करता माफक दरात,गुणवत्तेशी कुठेही तडजोड न करता दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईच्या काळात देखील ही सोय सर्वसामान्य, गरजूंसाठी कायमस्वरूपी सुरु राहील याची धडपड इथल्या संचालकांची सुरु असते. व्यवहाराच्या या काळात देखील आपले सामाजिक भान न विसरता उत्तरांचलातल्या प्रचंड महापुरात अडकलेल्या यात्रेकरूंसाठी ४५ हजारांपेक्षाही जास्त अन्न पाकिटे पाठवण्यापासून ते कोरोनाच्या महामारीच्या कालखंडात अत्यल्प प्रसंगी मोफत अन्नाचे वाटप देखील इथून केले गेले.आज देखील आत्यंतिक गरजू असलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था येथे केली जाते.

दिवसाला १५ जणांनी घेतलेल्या झुणका भाकरीच्या या क्षुधाशांती केंद्रातून आता दिवसाला १५०० पेक्षा जास्त जणांची भूक भागविली जाते. गरजपुर्ती पुर्णान्नाची,असो गरीब अथवा श्रीमंतांची नसावी मनी कुठली भ्रांती एकच नाव फक्त .. शुधाशांती…आज पर्यंत १ कोटींपेक्षाही जास्त गरजूंची भूक भागविलेले हे केंद्र, व्यवसाय म्हणून नव्हे तर व्रत म्हणून गेली ३० वर्ष अखंड सुरु आहे.

 

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *