"आम्ही चालवू हा पुढे वारसा..."
श्री पी.के.अण्णा पाटील फौंडेशनचा संस्था स्तरावरील मानाचा ‘पुरुषोत्तम’ पुरस्कार केशवस्मृतीला मिळाला. यापूर्वी कुसुमाग्रज प्रतिष्ठान ,साधना ट्रस्ट,मराठी विज्ञान परिषद, तीन विद्यापीठे यासारख्या विविध संस्थाना मिळालेला हा पुरस्कार केशवस्मृतीच्या कामाला मिळणे हा प्रतिष्ठानच्या मागील ३० वर्षाच्या कामाचा सन्मान नक्कीच आहे.
केशवस्मृतीच्या माध्यमातून देखील डॉ.आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कार दिला जातो. आजूबाजूला बघितल्यावर इतरांसाठी जगण्याची उमेद वाढेल, प्रेरणा मिळेल असे सहजपणे काही दिसत नाही. लबाडी, भ्रष्टाचार,दुर्बलावर अन्याय ,अत्याचार बातम्याचा उथळपणा आणि व्यवहाराचा सवंगपणा हे सर्व आजूबाजूला असतांना रंग, रूप, जाती, प्रथा, परंपरा यांच्या विविधतेने नटलेला आपला समाज आज सुद्धा सेवेची, परोपकाराची आपली मूल्य जपताना दिसतो,कारण ती मूल्य घेऊन काम करणारी अनेक ध्येयवेडी माणसे, संस्था अनामिकपणे काम करत आहेत. या संस्था समाजासमोर याव्यात, त्यातून समाजाचा असे काम करण्याचा हुरूप वाढावा या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात.
देणाऱ्याने देत जावे..घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे… या उक्तीचा एक वेगळा अर्थ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानने करत आहे. केशवस्मृती केवळ पुरस्कार देऊन थांबली नाही तर पुरस्कार ज्या कामासाठी दिले त्या कामाच्या गरजेचा स्थानिक शोध घेत ती कामेही सुरु केली. रेल्वेस्टेशनवर हरवलेल्या मुलांसाठीचा ‘समतोल प्रकल्प’, मतीमंद मुलांसाठी असलेले आजीवन निवारागृह ‘आश्रय-माझे घर’ हे प्रकल्प त्यातूनच उभे राहिले.
‘पुरुषोत्तम पुरस्काराच्या’ निमित्ताने ‘क्षेत्र कुठेही रिक्त राहिले हे आता होणे नाही’ या गीताच्या ओळीतील भाव प्रत्यक्षात आणणारा, सामाजिक समस्यांचा धांडोळा घेत,गाडून घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समूह आम्ही चालवू हा पुढे वारसा… हे गुणगुणत नव्या जोमाने असाच उभा राहील.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान