"त्याना माहेरी आलो असे वाटले..."

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहातून काही महिला अत्यंत उत्साहात,हसत बाहेर येत होत्या . त्यातल्या काहीजणी नृत्याचे कपडे घातलेल्या होत्या, काही लहान मुली देखील त्यांच्याबरोबर उड्या मारत बाहेर आल्या. बऱ्याच दिवसांनी खूप काही गवसल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. बोलता बोलता त्यातील एका जण दुसरीला म्हणाली ‘अग,किती वर्ष झाली भुलाबाई खेळून. लहानपणी खूप मज्जा यायची, लग्नानंतर सर्व बंदच झाले होते. आज अगदी माहेरी आल्यासारखे वाटले…’

सामाजिक कामात, प्रश्नांवर काम करणे जसे आले तसे, समाजात चालत आलेल्या चांगल्या रूढी परंपरा यांची जोपासना करून कालानुरूप बदल करत त्या परंपरेचे सरक्षण करणे संवर्धन करणे हे देखील आले. केशवस्मृतीच्या कामातील लोकसहभागाचा एक मोठा कार्यक्रम म्हणजे ‘भुलाबाई महोत्सव’. खान्देशातील सांस्कृतिक परंपरेचा ठेवा जतन करणारा हा कार्यक्रम शहरीकरणाच्या वेगात कमी होऊ लागला. त्या निमित्ताने शेती ,घरकामाच्या दैनंदिन व्यापात असलेल्या महिलांना अल्लडपणे एकमेकींची मजा घेत नेहमीच्या रहाटगाड्यातून मोकळे होत काही काळ तरी आपल्या सख्यांबरोबर वावरण्यास मिळणारा वेळच नाहीसा झाला होता. प्रतिष्ठानच्या भुलाबाई महोत्सवाने ही कमी भरून काढली. पारंपरिक गीतांवर केवळ मुलीच नाही तर प्रौढ महिला देखील ठेका धरून मनसोक्त नृत्य करताना दिसू लागल्या. नृत्य सादर करणाऱ्या,गीतं म्हणणाऱ्यांबरोबरच हा महोत्सव साजरा करणाऱ्या महिलाना त्यांचे मोकळे अवकाश मिळण्याचा आनंद मिळू लागला.

ऐलमा पैलमा गणेश देवा ..माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा.. , एकेक दाणा पेरत जाऊ माळीयाच्या दारी… या सारख्या पारंपारिक गीताना सामाजिकतेचे नवीन संदर्भ देत आधुनिकतेच्या नवीन साजावर, मोठ्या व्यासपीठावर आणण्याचे काम या महोत्सवाच्या निमित्ताने झाले. गणपती विसर्जनानंतर कोजागीरीपर्यंत आता पुन्हा एकदा शहरातील छोट्या गल्लींमध्ये भुलाबाईची गाणी घुमू लागली आहेत…

 

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *