“ त्यांची दिवाळी करू प्रकाशमय ”

पहिला लॉकडाऊन..आठवडा वेगळा गेला. कोणीच काही करत नव्हते. ऑफिस बंद…गाड्या बंद.. दुकान बंद.. नोकरी बंद..सगळे घरीच …एका वेगळ्या दैनंदिन जीवनाची सुरवात..सुरवातीला गम्मत वाटली नंतर अनिश्चितता आणि मग भिती.. हातावर पोट असणाऱ्या समाजातील एका वर्गाचे हे प्रश्न अधिक गंभीर होते. दिवस जसे जात होते तसे त्यांचे हे प्रश्न अधिक गडद,भेसूर होत चालले होते.

केशवस्मृतीच्या सेवा वस्तीचे काम ज्या भागात चालते तेथील परिस्थिती देखील काही वेगळी नव्हती. कुणी हातमजुरीवाला तर कोणी रिक्षाचालक कुणी रोजचा भाजी विकणारा तर कुणी MIDC मध्ये काम करणारा. सगळ्यांना सुट्टी तर मिळाली पण रोजीरोटी गेली. वस्तीत शिवणक्लास चालायचा. सर्वाना मास्कची अनिवार्यता होती त्यामुळे कापडी मास्क बनविणे सुरु केले. महिलांना काम मिळाले थोडे पैसेही मिळाले. दिवस भरभर जात होते. दसरा-दिवाळी काही काळाने सुरु होणार होती. वस्तीतील महिलांना अधिक काम मिळावे म्हणून पणत्या रंगवून विकण्याचे ठरवले. शाळेत असताना कधीतरी चित्र काढण्यासाठी हातात घेतला असेल तेवढाच काय तो ब्रश आणि रंगाचा संबध असलेल्या महिलांनी आता जगण्याच्या लढाईसाठी पणत्या रंगविण्याचे आव्हान स्वीकारले.कधी रंग दाट तर कधी जास्त पातळ कधी रंग संपला तर कधी पणत्या असे करत करत, पहिल्याच वर्षी २५ हजार पणत्या रंगवून त्यांची विक्री करण्यात सर्वाना यश मिळाले. त्या वर्षी वस्तीतील काही घरातील अंधारात त्या पणत्यांनी उजेड केला.

दिवाळीचा हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येत असतो.हा प्रकाश सेवावास्तीतील काम करणाऱ्या महिला, मुले यांच्याही आयुष्यात येण्यासाठी हे दिवे आकर्षक प्रकारच्या सजावटीतून विक्री करून ‘चलो जलाये दीप वहॉ..जहॉ अभी भी अंधेरा है..’ ची प्रचिती देण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानचा आहे. चला या वर्षी देखील आपण सर्व जण “त्यांची दिवाळी करू प्रकाशमय या प्रकल्पात सामील होऊया.

Seva Samvad 26 Sep 2022

 

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *