आणि त्याला नवी दृष्टी मिळाली...
वृद्धाश्रमात जुन्या बॅटरीचे काम करता करता काही चूक झाली आणि त्या बॅटरीचा छोटासा स्फोट झाला. सहाय्यकाचे काम करणाऱ्या किरणला काही कळायच्या आताच डोळ्याला आणि एकदोन ठिकाणी जखम झाली. डोळ्याची जखम तशी गंभीर होती. तातडीने त्याला दवाखान्यात हलविले. तपासणी केल्यावर एका छोटे ऑपरेशन गरजेचे आहे असे कळल्याने डॉक्टरांकडे शस्त्रक्रिया केली. पाच दिवसांनी पुन्हा तपासल्यावर लक्षात आले की बहुतेक एका डोळा निकामी होईल. ‘आशा’ माणसाला जिवंत ठेवते म्हणतात.अजून काही मोठ्या हॉस्पिटल मध्ये दाखवूया असे ठरवून जालना,नगर,पुणे, पनवेल येथील डॉक्टरांचे प्रत्यक्ष भेटून सल्ले घेतले, पण त्या डोळ्यांनी दिसण्याची आशा दिवसेंदिवस कमीच झाली. किरणचा काही काळ निराशेत गेला. या विषयात करता येण्यासारखे सर्व केले याचे समाधान त्याला व संस्थेतील सर्वांनाच होते. त्याच्या मनात मात्र काहीतरी पक्के ठरत होते.
एके दिवशी संस्थेच्या प्रमुख कार्यकर्त्याशी बोलताना तो म्हणाला सर, मला तर आता एका डोळ्याने दिसणार नाही हे नक्की. मला वृद्धाश्रमात पुन्हा पाठवले तरी चालेल. पण मला विचाराल तर तुम्ही मला नेत्रपेढीत काम करायला पाठवा. थोडे आश्चर्याने त्या कार्यकर्त्याने विचारले अरे, तुला आता एका डोळ्याने दिसत नाही तरी तू जाणीवपूर्वक नेत्रपेढीत काम करण्याचे का सांगतो आहेस? तो म्हणाला सर, माझ्या डोळ्यांच्या तपासणी निमित्ताने मी महाराष्ट्रातील मोठ्या नेत्र रुग्णालयात जाऊन आलो.त्या निमित्ताने मला चांगली नेत्र रुग्णालय कशी असतात, ज्यांना डोळ्याचा आजार आहे त्यांच्या गरजा काय असतात,त्यांच्याशी कसा व्यवहार केला पाहिजे हे माझ्या अनुभवातून समजले. हे सर्व आपल्या नेत्रपेढीत मी करू शकेन असे मला वाटते. त्यामुळे तुम्ही मला नेत्रपेढीत पाठवले तर आनंद होईल.
सुरेश भटांची एक गझल आहे,भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले…एका वेगळ्या अर्थाने किरणने जे दु:ख भोगले त्यातून काही नवा विचार घेत पुढील मार्गक्रमण करायचे त्याने ठरवले. किरणचा एक डोळा गेला होता, मात्र त्याच्या विचाराने त्याला आणि त्याच्या बरोबरीच्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या कामाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मात्र मिळाली होती.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान