त्यांच्या आयुष्याच्या अंधाऱ्या काळरात्रीतून नव्या सूर्यप्रकाशाकडे...

प्रतिष्ठानच्या कार्यालयातील फोन वाजला, भुसावळ रेल्वे स्टेशनच्या एका निर्मनुष्य कोपऱ्यात पडलेल्या मुलाबद्दलची माहिती कोणीतरी समतोलच्या कार्यकर्त्यांना दिली. सांगितलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर एक १६-१७ वर्षाचा मुलगा बेशुध्द अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला दिसला.आजुबाजूला चौकशी केली तर कळले की तीनचार दिवस स्टेशनवर काहीतरी मागून तो खात विमनस्क अवस्थेत स्टेशन परिसरात फिरत होता. त्यादिवशी मात्र बराच वेळ तो पडलेल्या जागेवरून उठलाच नव्हता.त्यामुळे प्रतिष्ठानच्या कार्यालयात रेल्वे स्टेशनवरून फोन आला होता.

त्या मुलाला ताब्यात घेण्याचे सर्व तांत्रिक सोपस्कार करून समतोलच्या कार्यकर्त्यांनी त्याला जळगाव येथील बालगृहात दाखल करण्यासाठी आणले. त्याची तब्बेत प्रचंड खालावल्याने सिव्हील हॉस्पिटल मध्ये त्याला दाखल केले. कुठलीच शुद्ध नसलेल्या त्याचे नैसर्गिकविधी अंगावरच्या कपड्यात होते. तीन दिवस त्याची सर्व स्वच्छता करत,त्याच्याशी बोलत हळू हळू काही माहिती मिळायला लागली.पुणे,लखनौ,कर्जत, बलरामपूर अशी नावे आणि तो सांगत असलेले नंबर येथे फोन करणे कार्यकर्त्यांनी सुरु केले. खूप प्रयत्नांनतर एक फोन लागला. मुलगा,शमशाद अली, उत्तर प्रदेशातील बलरामपूरचा होता. दोन दिवसांनी त्याचे वडील कार्यालयात आले. मुलाला बघून त्यांनी हंबरडा फोडला. दोन महिने ते त्याच्या शोधात होते. तो समोर दिसताच त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबतच नव्हते..

प्रतिष्ठानच्या समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून आज असे २५०० पेक्षाही जास्त समशाद,अजय,ज्योती,प्रवीण सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहेत…
त्यांच्या आयुष्याच्या अंधाऱ्या काळरात्रीतून नव्या सूर्यप्रकाशाकडे…

 

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *