आणि दोघांनीही मोकळा श्वास घेतला...

घरात नवीन बाळ येणार याची चाहूल लागली आणि सर्वजण आनंदित झाले. तिसरे बाळंतपण असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली होती. त्यामुळे आवश्यक तेवढी कामे करून ‘ती’ आराम करायची. मोठा मुलगा मतीमंद असल्याने त्याच्याकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे लागत असे. हल्ली आई आपल्याकडे नीट लक्ष देत नाही हे त्याला जाणवले.
‘तो’ आतून धुसमुसू लागला होता. हा राग आता पाच वर्षाच्या लहान बहिणीला मारण्यातून निघू लागला. त्या बिचारीला आत्तापर्यत चांगला वागणारा भाऊ असे काय करतोय ते कळेनासे झाले. निष्पाप बहिण भीतीने गारठून गेली आणि त्यापेक्षाही अधिक भेदरले ते तिचे आई बाबा. या परिस्थितीत काय करावे. मुलाला कसे सांभाळावे. पोटातला जीव वाढवताना समोरच्या जीवाचे हाल त्या दोघानाही बघवत नव्हते.

अशावेळी त्यांना कोणीतरी “आश्रय- माझे घर” बद्दल सुचवले. घरात येणारा नवीन पाहुणा आणि तो सुखेनैव यावा या साठी मोठ्या भावाला असे दूर ठेवणे आई वडिलांची परीक्षा बघणारेच होते. कसाही असला तरी पोटच्या गोळ्याला असे दूर ठेवणे जडच. पण मनावर दगड ठेऊन त्यांनी त्याला ‘आश्रय’ मध्ये आणले. सुरवातीला कठीण वाटणारा कालावधी संपला आणि ‘तो’ ‘माझ्या घरात’ रुळला. राहण्या खेळण्यास प्रशस्त परिसर, उत्तम जेवण, आजारपणात घेतली जाणारी काळजी, नियमित डॉक्टर तपासणी आणि मोकळ्या वेळेतील काळजीवाहक दादांबरोबरची खेळ, मज्जा..दिवस अगदी मजेचे…!

काही वेळ गेला.. नवीन पाहुणा घरात आला..आश्रय मधील ‘याच्या’ आनंदी वावरण्याने आई बाबा दोन लहानग्यांसह समाधानी आयुष्य जगात आहेत… दोघांनाही मोकळा श्वास मिळाला…. “आश्रय -माझे घर” मुळे अशा अनेकांची अवकाश मोकळी होतायेत.

 

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *