वृद्धाश्रम खूप आहेत. पण त्यातले किती आनंदाश्रम आहेत?
समाजसेवेत रममाण असलेले दांपत्य. अपत्यप्राप्ती न झाल्याने त्यांनी अनाथाश्रमातील मुलाला दत्तक घेऊन वाढविले, डिप्लोमाचे शिक्षण दिले. चांगली नोकरी लागली. दुर्दैवाने मुलाला स्किझोफ्रेनिया हा मानसिक रोग जडला. दरम्यान आजोबांचे निधन झाले. माऊलीच्या नावावर उदरनिर्वाहासाठी लागणारी रक्कम, राहता फ्लॅट होता. अश्या वेळी मानलेले भाऊवहिनी खूप उपयोगी पडले. बँकेची, कागदपत्रांची आणि व्यवस्था खूप चोख रित्या सांभाळली. मुलावर औषधोपचार सुरू होते.
माऊलीचे दुर्दैव असे की एकदा त्या मुलाने आजाराच्या भरात त्यांच्या कानावर खूप मोठा आघात केला. घाबरून भाऊवहिनींनी माऊलीला मातोश्री आनंदाश्रमात दाखल केले. मुलाची परिस्थिती उपचाराविना, योग्य आहाराविना खालावत गेली. आजाराच्या भरात राहत्या घरात कचरा जमा करुन पेटवला, त्यात टी.व्ही, वायरिंग सकट बर्याच वस्तूंचे नुकसान झाले.
माऊलीला काय करावं ते कळत नव्हतं. आश्रमात येऊनही 4 वर्षे झाली. त्यांची सगळी व्यवस्था अतिशय घरच्यासारखी. पण मुलाचं कसं होईल या चिंतेने उदासिनता वाढत होती.
भाऊवहिनींच्या आणि मातोश्री आनंदश्रमाच्या संचालकांच्या एकविचाराने आशेचा किरण दिसला. मुलाला (वय 40) पुण्याला मनोरुग्णांच्या संस्थेत माफक खर्चात प्रवेश मिळाला. उपचार सुरु झाले. योग्य आहार नियमितपणे मिळू लागला. माऊलीच्या डोक्यावरील निम्मे ओझे उतरले. तीच संस्था मुलाचे पुनर्वसन करेल ही खात्री झाली. आजींच्या सर्व विवंचना संपल्या, त्या पूर्णपणे चिंता रहित झाल्या.
मातोश्री अंनंदाश्रम… इथे वयोवृद्ध आजी आजोबा यांची केवळ निवारा आणि भोजनाची सोय होते असे नाही. तर त्यांच्या काळज्या, विवंचना, अडचणी आणि प्रश्न यांचे पूर्णतः निराकरण करून त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ अधिक निश्चिंत व्हावी ही काळजी जाणीवपूर्वक लक्ष देऊन घेण्यात येते.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान