ये हृदयी चे, ते हृदयी

समाजाची दिसणारी वेदना जेंव्हा हृदयात उतरते तेंव्हा त्यातून जे कार्य उभे राहते त्याला सेवा म्हणतात.

ही वेदना कधी रिकाम्या पोटाची, ढासळत्या आरोग्याची, आर्थिक दुर्बलतेची, जगण्याच्या सामान्य जीवनमानाची, हक्काच्या आधाराची तर कधी “कसा आहेस रे तू ?” इतक्या साध्या पण प्रेमाने ओथंबलेल्या चार शब्दांचीही असते.

या प्रत्येक वेदनेवर फुंकर घालावी आणि आपल्यापरीने वेदनेचे परिमार्जन करावे इतक्या निरलस भावाने केशव स्मृती प्रतिष्ठानची ९ मे १९९१ या दिवशी सुरुवात झाली.

छोट्या उपक्रमाच्या व्याप्तीतून अन्य समस्यां लक्षात येत गेल्या. त्या समस्यांवर उत्तर शोधताना सेवा कार्याचा परीघ विस्तारत गेला.

समाजाच्या एका वर्गाच्या वेदना दूर करत असताना दुसर्‍या बाजूला उभ्या असणार्‍या संवेदनशील व्यक्तींनी हे सर्व काम आपल्या हजार हातांनी तोलून धरले. ‘संघ शक्ति कलौ युगे’ चा सांघिक प्रत्यय आणून दिला. समस्यांचा गोवर्धन असंख्य हातांनी सहज उचलला गेला.

गोवर्धंनाच्या छत्रछायेत सेवा कार्याच्या अनेक यशदायी कहाण्या विकसित झाल्या. अनेक आनंददायी अनुभवांनी सेवा कार्यावरचा विश्वास वृद्धिंगत होत गेला. इथले समाधानी क्षण नवनवीन आयामांना साद घालत गतिमान होत गेले.

आपल्या सर्वांची ही मनोमन धारणा आहे की जळगावच्या मातीत उभे राहिलेले ‘केशव स्मृती प्रतिष्ठान’चे कार्य म्हणजे लोक सहभागातून प्रवाहीत झालेल्या पुण्यसलीलेच्या काठावरची यशोशिखरे आहेत. इथल्या स्मृतीमंदिरातील यशोगाथा सेवा संवादाच्या माध्यमातून प्रत्येक सोमवारी आपल्यापर्यन्त पोहोचाव्या हा आमचा इथून पुढे प्रांजळ प्रयत्न आहे. “ये हृदयी चे, ते हृदयी” चा भाव अधिक प्रशस्त करणारा असेल हा विश्वास आहे.

प्रत्येक सोमवारच्या सेवा संवादातून हा विश्वास अधिकाधिक दृढ होत जाईल अशी खात्री आहे.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान