भीतीचे सावट झुगारून...सतर्क राहू... सजग होऊ
स्वत:च्या पत्नीच्या मृतदेहाशी बसून आपल्या मेहुणीला माझ्याशी लग्न करशील का ? असे विकृतपणे विचारणार्या 72 वर्षाच्या नराधमाच्या डोळ्यासमोर आली एक निरागस सहा वर्षांची मुलगी. शाळेच्या सुट्टीत जळगाव जिल्ह्यातल्या एका गावात मामाकडे गेली होती. मामाच्या घरासमोरच या नराधमाचे घर होते. सहा वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याने तिला घरात घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला.
वेदनेने तडफडणार्या मुलीला पाहून आईने मुलीला विश्वासात घेतले. झाला प्रकार घरच्यांच्या लक्षात आला. जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवायला गेलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी थातुरमातुर उत्तरे देवून हाकलून देण्याचा प्रयत्न केला.
केशवस्मृती प्रतिष्ठानला चाइल्ड लाईन च्या माध्यमातून हे कळते. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्वरित त्याठिकाणी पोहोचतात. नराधमाला शोधण्यासाठी त्याच्या घरच्यांची मदत घेण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्याच्या मुलांकडे जातात. घरचे कानावर हात ठेवतात. ते स्पष्ट सांगतात की तो आम्हाला मेला आहे. कार्यकर्ते पोलिसांना तक्रार नोंदवून घ्यायला भाग पाडतात पुढे तपासाची चक्रे फिरतात.
नराधम पकडला जातो. आईला भीती असते की तो सुटला तर माझ्या आणि मुलीच्या जीवाला धोका आहे. मुलीचे आणि आईचे समुपदेशन केले जाते. आज ते त्या भीतीतून बाहेर पडले आहेत. मुलीला शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत १लाख रुपये मंजूर करून घेण्यात आले. त्यांनी मोकळेपणाने मान्य केले की तुम्ही होतात म्हणून ह्या विकृत माणसाला अटक झाली.
समाजातील अशा अनेक विकृतांना जरब बसवायची आहे. अनेक निर्भयांना आणि त्यांच्या घरच्यांना भीतीमुक्त करायचे आहे.
सतर्क राहू… सजग होऊ