...... आणि एक जागा रिकामी झाली

वृद्धाश्रम हे विभक्त कुटुंब व्यवस्थेचे भयाण वास्तव आहे. या वास्तवाचे चटके किती कमी करता येतील यासाठी जळगावच्या आनंदाश्रमाचे प्रयत्न सुरू असतात. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालणारे आनंदाश्रम ही अनोखी संस्था आहे.

सरकारी नोकरीत असलेल्या मुलाचे वडील वृद्धाश्रमात येतात. पण मुलगा त्यांना तिथे थांबू देत नव्हता. वरवर वाटणारे चित्र आश्वासक वाटत असले तरी त्यामागचे नेमके कारण आनंदाश्रमाच्या संचालकांनी शोधले.

वडिलांच्या निवृत्ती वेतनात आणि त्यांच्या स्थावर मालमत्तेत असलेला आपला हिस्सा जावू नये म्हणून मुलगा त्यांना आश्रमात राहू देत नव्हता आणि मी म्हातारा असहाय्य झालोय म्हणून मुलगा मला मारतो. मी त्याच्या बरोबर राहू शकत नाही.. मला इथेच राहायचे, ही वडिलांची केविलवाणी विनंती.

आनंदाश्रमाच्या चालकांनी वृद्धाच्या मुलीला बोलावून घेतले. नियमाप्रमाणे रीतसर तक्रार केली. कायदेशीर कारवाई झाली. वृद्धाचे राहते घर त्यांचे त्यांना परत मिळाले. उर्वरित शेती मुलाला मिळाली आणि मुलगी आपल्या वडिलांना घेवून तिच्या घरी गेली.

वृद्धाश्रमातील एक जागा रिकामी झाली यापेक्षाही असहाय्य वृद्धाला त्याची आपली माणसं मिळाली हा आनंदाश्रमासाठी मोठा आनंद आहे.

– केशवस्मृती प्रतिष्ठान