घराला पुन्हा घरपण आले…

 

रंगराव आज बऱ्याच दिवसांनी दारू न पीता पोटभर जेवला होता. तीन महिन्यापूर्वी गायब झालेला त्याचा १३ वर्षाचा मुलगा आज परत आला होता. यापुढे आपण कधीही दारू प्यायची नाही असे ठरवूनच मुलाला त्याने कवटाळले होते. त्याच्या आयुष्यात आज खूप आनंदाचा दिवस होता.

तीन महिन्यापासून गायब झालेला विजय जळगाव स्टेशनला समतोलच्या टीमला सापडला. स्टेशनवरचे सर्व सोपस्कार आटोपून मेडिकल चेकअप करून बाल कल्याण समितीपुढे विजयला उभे केल्यावर त्याने निमुटपणे सांगितलेल्या पत्त्यावर त्याला पाठवायचा आदेश समितीने दिला. वडिलांच्या दारू पिण्याने त्रस्त झालेला नववीत शिकणारा विजय तीन महिन्यापूर्वी घर सोडून बाहेर पडला होता. विजयाचे काका गावचे सरपंच पण त्यांचेही काही चालत नव्हते. मुलाने घर सोडल्यावर रंगरावच्या त्रासाला कंटाळून त्याची बायको सुद्धा माहेरी निघून गेली होती. मुलाच्या जाण्याने मात्र रंगराव भानावर आला. मुलाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता पण तो सापडलाच नाही. पश्चातापाने विव्हळलेल्या रंगरावाने मुलगा मिळाल्यास दारू सोडून काही नोकरी धंदा करण्याचा पण केला होता आणि आज समतोलच्या प्रयत्नाने त्याचा हरवलेला मुलगा त्याला परत मिळाला होता. 

काही दिवसापूर्वी विजयची चौकशी करण्यासाठी समतोलच्या कार्यकर्त्याने फोन केला तेव्हा कळले विजय आता  बारावीत शिकत होता. त्याची आई आता परत घरी आली होती. त्याच्या बाबांनी, रंगरावांनी, नवीन दुकान थाटले होते. घराला पुन्हा घरपण आले होते. अशी खूप घरे आज समतोलच्या घर वापसीने उभी राहिली आहेत.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतिक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *