जुळले नाते रक्ताचे…

 

वय २१ वर्ष, वजन ९० किलो असा देह धारण केलेला महेंद्र बारी रक्तदान कँपला सहज आला होता. या पूर्वी देखील झालेल्या रक्तदानाच्या वेळी तो हजर असायचा पण त्याने रक्तदान मात्र कधी केले नव्हते. वजनाने बलदंड असलेल्या महेंद्रला सुई टोचून रक्तदान करण्याची मनातून भिती होती.

त्यामुळे दरवेळी त्याने रक्तदान टाळले होते. यावेळी मात्र कँप संयोजकाने आणि रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकारी अर्जुनने त्याला रक्तदान करायला लावायचे असे ठरवले होते. कँप सुरु झाला आणि नेहमी प्रमाणे व्यवस्था करण्यासाठी महेंद्र तेथे हजर झाला. व्यवस्थेची कामे लावून कँप सुरळीत सुरु झाल्यावर अर्जुनने महेंद्रला निवांत बसवून रक्तदानाची आवश्यकता त्याचे आपल्याला आणि समाजाला होणारे फायदे याबद्दल सांगितले. महेंद्रच्या डोळ्यासमोर मात्र दंडात टोचणाऱ्या सुईचा होणारी वेदना दिसत होती. अर्जुनने त्याचे सर्व कौशल्य पणाला लाऊन महेंद्रला डोनरकोचवर झोपवलेच. रक्त घेण्यासाठी जवळ आलेल्या टेक्निशियनला बघून त्याने मिटलेले डोळे रक्त पिशवी भरल्यावरच उघडले. सारे कसे सुरळीत झाले हे बघून त्याला देखील मनातून बरे वाटले.

त्या नंतर मात्र महेंद्रला कँपमध्ये रक्त दे असे कधीच सांगावे लागले नाही. रक्ताशी त्याचे नाते जुळले ते कायमचेच. आज तेथे होणाऱ्या प्रत्येक कँपचा पहिला रक्तदाता महेंद्र असतो.रक्त काही प्रयोगशाळेत तयार होत नाही. ते एकाने दिल्यास दुसऱ्या गरजूला देता येते. मात्र हे साध्य होण्यासाठी असे असंख्य महेंद्र तयार करण्याचे व्रत घेऊन काम करणारी माणसे गरजेची आहेत.

रक्तदान ही चळवळ झाली पाहिजे असा भाव मनात ठेऊन काम करणाऱ्या अशाच सहकाऱ्यांच्या जोरावरच माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे काम मागील २४ वर्ष सुरु आहे. तांत्रिकतेच्या, मनुष्यबळाच्या अडचणीवर मात करत यावर्षी नव्या जागेत रक्तपेढी आपले ‘रौप्य महोत्सवी वर्ष’ साजरे करत आहे.

sewa-samvad-29

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *