….त्या स्वच्छता दूतांच्या डोळ्यात देखील आसवांची फुले जमा झाली

प्रगल्भ समाजमनाचा नवा भारत घडवूया…

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला. ‘हर घर तिरंगा’ मोठ्या डौलाने फडकला. राष्ट्रभक्तीचा स्वर समस्त भारतवर्ष गुणगुणत होता. राष्ट्रभक्तीपर गीतांच्या स्पर्धा, एकत्रिकरणे,शहराच्या मध्यवर्ती भागात सर्वाना दिसेल असा उंच ध्वज लावणे, अमृतमहोत्सवी दौड अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विविधतेचे प्रकटीकरण जल्लोषात झाले.

विवेकानंद प्रतिष्ठानने देखील शहराच्या मध्यवर्ती भागातून चार हजार मुलांची भव्य शोभायात्रा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काढली. हातातील तिरंग्याबरोबरच समग्र भारताच्या संस्कृतिक, कला, क्रीडा, स्वातंत्र्यसंग्रामाचे आणि विविधतेचे दर्शन देणारे जिवंत देखावे असलेली दोन किलोमीटर लांब शिस्तबध्द मिरवणूक ही शहरात चर्चेचा विषय ठरली. फुलांच्या वर्षावात रस्त्यावर मिरवणुकीचे स्वागत झाले तर काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

अशा स्वागताच्या ठिकाणावरून मिरवणूक पुढे गेली की शेवटी असलेला स्वच्छता करणारा प्रतिष्ठानचा एक गट रस्त्यावर पडलेला फुलांचा सडा, पाण्याच्या बाटल्या, कागदी ग्लासेस यांची सफाई करत मिरवणुकीचा रस्ता स्वच्छ करत होता. मिरवणूक बघायला आलेल्या नागरिकांसाठी हे नवीनच होते. शिवाजी पुतळ्या जवळून मिरवणूक पुढे गेली.

रस्त्यावरच्या फुलांच्या पाकळ्या, पाण्याच्या बाटल्या उचलल्या गेल्या आणि काही कळायच्या आत सफाई करणाऱ्या त्या सहकाऱ्यांवर पुन्हा एकदा पुष्पवर्षाव झाला. मिरवणूक बघायला आलेल्या नागरिकांनी अत्यंत आत्मीयतेने आणि उस्त्फुर्तपणे दिलेली ती दाद होती.
अंगावर पडणाऱ्या पुष्प वर्षावाला बघून त्या स्वच्छता दूतांच्या डोळ्यात देखील आसवांची फुले जमा झाली.

वयानेच ७५ झालो असे नाही तर समजुतीने देखील लोकशाही प्रगल्भतेकडे प्रवास करायला लागल्याचे द्योतक त्या घटनेने सर्वांनाच दिले. समाजमन घडविण्याच्या या प्रवासातील आपण देखील पाईक होऊया…नवा भारत घडवूया ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *