केशवस्मृती प्रतिष्ठानच्या संगीत रजनी कार्यक्रमात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांची घोषणा

जळगाव : नाशिक येथील गुरुजी रुग्णालय आणि छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय यांच्या धर्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केशवस्मृती प्रतिष्ठानच्या मदतीने जैन उद्योग समूहाच्या पुढाकारातून जळगाव शहरातदेखील सेवाभावी असे भव्य रुग्णालय उभारण्याचा मानस जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केला. जळगावात असे रुग्णालय असावे, अशी केशवस्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष स्व. अविनाशदादा आचार्य यांची संकल्पना होती, याची त्यांनी आठवण करून दिली.

केशवस्मृती प्रतिष्ठान दि. 9 मे रोजी 32 वर्षे पूर्ण करीत आहे. तसेच केशवस्मृती संचलित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र, मांगीलाल बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय तसेच मातोश्री आनंदाश्रम या तीन प्रकल्पांचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने रविवार, दि. 7 मे रोजी सायंकाळी ‘संगीत रजनी’ हा बहारदार मनोरंजनपर संगीताचा कार्यक्रम शहरातील महाबळ रस्त्यावरील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात झाला.

त्यात अशोक जैन यांच्या हस्ते सत्कारार्थींचा सत्कार केल्यानंतर मनोगत व्यक्त करीत होते. सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी पैशापेक्षा समर्पण भाव असलेली माणसे भेटणे कठीण असताना केशवस्मृतीच्या माध्यमातून शाश्वत सामाजिक कार्य सुरू असणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

व्यासपीठावर अशोक जैन यांच्यासह केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, मातोश्री वृद्धाश्रमाच्या प्रकल्पप्रमुख अनिता कांकरिया, गोळवलकर रक्तपेढीचे प्रकल्पप्रमुख शरद कोत्तावार, समतोल प्रकल्पाचे प्रमुख राहुल पवार, मांगीलालजी बाफना नेत्रपेढीचे प्रकल्पप्रमुख डॉ. धर्मेद्र पाटील उपस्थित होते.

भरतदादा अमळकर यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी सांगितले की डॉ. अविनाश आचार्य यांनी लावलेल्या रोपट्याचे रुपांतर आज वटवृक्षात झाले आहे. समाजात जिथे पोकळी असेल तिथे कार्य करण्याच्या संस्थेच्या ध्येयामुळे एका संस्थेला विविध प्रकल्पांच्या माध्यमातून वेगवेगळी फळं आलेली दिसून येतात. त्याचेच फलित म्हणजे मातोश्री आनंदाश्रम, मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र यांचे 2023 हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यासोबतच समतोल, सेवावस्ती चाईल्ड लाईन यासारखे प्रकल्प अतिशय संवेदनशील विषयांवर संस्था काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
नटरंगाच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भानुदास येवलेकर व अमोल जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

यांचा झाला सत्कार

केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित विविध प्रकल्पांमध्ये ज्यांनी 25 वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ अखंडपणे सेवा दिली, अशा सेवाभावी कर्मचार्‍यांचा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. त्यात गोळवलकर रक्तपेढीत सेवा देणारे डॉ. नलिनी वैद्य व डॉ. सुहास वैद्य, पहिल्या दिवसापासून गोळवलकर रक्तपेढीत नंतर प्रतिष्ठानच्या विविध प्रकल्पात सेवा देणारे भानुदास येवलेकर, केशवस्मृती प्रतिष्ठानशी 27 वर्षांपासून जुळलेले परेश सिकरवार, गोळवलकर रक्तपेढीत सहायक म्हणून कार्यरत श्रीकांत मुंडले, मांगीलाल नेत्रपेढीचे माहीतगार तथा सध्या केशवस्मृती प्रतिष्ठानच्या मुख्यालयात सेवारत किशोर गवळी यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.

किरण सोहळे आणि सहकार्‍यांनी संगीत रजनी हा संगीताचा बहारदार कार्यक्रम सादर केला. श्रुष्टी जोशी, वरुण नेवे, सुयोग गुरव, नकुल सोनवणे आदी कलाकारांनी सहभाग घेतला.

सर्व कलाकारांचा केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठराव गायकवाड व कोषाध्यक्ष दिलीप चोपडा यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाला. यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गत चालणार्‍या विविध प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *