जळगाव (प्रतिनिधी): समाजाने आम्हाला भरभरून दिले आहे त्याचे ऋण फेडणे गरजेचे असल्याची भावना नेवे ब्रदर्स परिवाराचे प्रमुख मधुकर नेवे यांनी आज येथे व्यक्त केली. सावखेडा येथील निसर्गरम्य परिसरातील मातोश्री आनंदाश्रमात हृद्य सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सचिव रत्नाकर पाटील, मातोश्री आनंदाश्रमच्या प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया, सत्कारार्थी मधुकर नेवे व मालती नेवे दाम्पत्य उपस्थित होते.

दाता तत्र दुर्लभः !

यावेळी बोलतांना भरत अमळकर यांनी “शतेषु जायते शूरः सह्स्त्रेषु पंडित:, वक्ता दश सह्स्त्रेषु, दाता भवती वानवा” या संस्कृत सुभाषिताचा समर्पक संदर्भ देत दाता मिळणे दुर्लभ असल्याचे सांगितले. नेवे यांच्यासारखे दाते दुर्मिळ असले तरी चांगल्या कार्याला मदत करण्यासाठी समाजातील अनेक दानशूर पुढे सरसावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या सव्वाशे वर्षापासून सुरु असलेल्या आमच्या पुस्तक विक्री व्यवसायाद्वारे वाचक तसेच समाजाकडून भरपूर व बरेच काही मिळाले. यामागे आमच्या वडिलांसह अनेकांचे परिश्रम तसेच समाजाकडून मिळालेल्या प्रतिसाद असल्यावरही भर यांनी दिला. याप्रसंगी मातोश्री आनंदाश्रमातील आजी-आजोबांना निस्वार्थ आरोग्यसेवा देणारे डॉ. राजेश डाबी, डॉ अमोल पाटील, डॉ. विवेक जोशी, डॉ. सुनिल कुलकर्णी व गणानाम सत्संग परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तर डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ अतुल सरोदे, डॉ प्रियदर्शनी सरोदे, डॉ प्रताप जाधव, डॉ. अभय गुजराथी, डॉ परीक्षित बाविस्कर, डॉ. चंद्रकांत कोतकर, डॉ. अमेय कोतकर यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

आनंदाश्रमास रु १० लाख देणगी दिलेल्या मधुकर नेवे व मालती नेवे यांचा सत्कार भरत अमळकर, अनिता कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता कांकरिया, सूत्रसंचालन सागर येवले यांनी तर गौरवपत्र वाचन विश्वास कुलकर्णी यांनी, डॉक्टरांप्रती कृतज्ञता संजय काळे यांनी व्यक्त केली. आभारप्रदर्शन छाया पाठक यांनी केले. यावेळी नेवे परिवारातील सदस्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास केशवस्मृती प्रतिष्ठानमधील सद्स्यांसोबतच नेवे परिवारातील सदस्य उपस्थित होते.