जळगाव (प्रतिनिधी-) जळगाव शहरातील नेरी नाका वैकुंठधाममध्ये शहरातील बहुतांश मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र वृक्षतोडीवर बंदी आल्याने गेल्या अनेक वर्षापासून लाकडांची कमतरता भासते तशीच ती येथेही भासत असे. वृक्षतोडीने पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यातुन आता तेथे  आधुनिक शवदाहिनी बसविण्याचा विचार पुढे आला. समाजाकडूनही अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. जळगाव जिल्ह्यात सेवाकार्यात अग्रेसर असलेल्या केशवस्मृती प्रतिष्ठानने यात पुढाकार घेऊन अत्याधुनिक अशी शवदाहिनी बसविण्यासाठी पुढाकार घेतला आणि महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी तसेच देणगीदारांनी सकारात्मक सहयोग दर्शविल्याने हे काम पूर्ण झाल्याची माहिती  केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री भरत अमळकर यांनी आज नेरी नाका येथील वैकुंठधाम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रकल्प प्रमुख श्री नंदु अडवाणी, केशवस्मृती प्रतिष्ठान चे सचिव श्री रत्नाकर पाटील, समन्यवक श्री. सागर येवले उपस्थित होते.

केशवस्मृती सेवा समूहाच्या माध्यमातून आजमितीस जळगाव शहर आणि  जिल्ह्यात विविध प्रकल्प चालविण्यात येतात.

पर्यावरण रक्षण व लाकडांची बचत – एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारणत: एका झाडाची लाकडे लागतात. परंतु पावसाळ्यात अनेकदा लाकडे ओली असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नेरी नाका स्मशानभूमीत दररोज ८ ते १० मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर लाकडे लागतात. या शवदाहिनीमुळे  त्याची बचत होईल.

अत्याधुनिक शवदाहिनी – ही शवदाहिनी पूर्णपणे एल पी जी गॅसवर कार्यान्वित राहणार आहे. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊन अस्थी मृताच्या नातेवाईकांना २ तासांनी उपलब्ध होतील. दररोज शवदाहिनी मध्ये ८ मृतावर अंत्यसंस्कार केले जाऊ शकतील. या माध्यमातून खर्चात देखील बचत होणार आहे. केवळ  रु. १५००/- इतके सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे.

स्वयंसहायता गटाची निर्मिती – केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गॅस दाहिनीचे संचालन योग्यरीतीने व्हावे याकरिता जळगाव शहरातील विविध समाजातील नागरिकांचा समावेश असलेला स्वतंत्र स्वयंसहायता गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या माध्यमातून या वैकुंठदाहीनीचे संचालन व व्यवस्थापन केले जाणार आहे. याचे प्रमुख म्हणून जळगावातील उद्योजक श्री नंदु अडवाणी हे काम पाहतील. यात सेवाभावी काम करू इच्छिणाऱ्याचे स्वागत आहे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या दाहिनीचे काम लांबणीवर पडले. खरेतर, मे २०२० अखेरपर्यत हे काम पूर्ण होणे आम्हाला अपेक्षित होते.

यानिमित्ताने संपूर्ण वैकुंठधाम परिसराचा कायापालट करण्यात आला आहे. नागरिकांना बसण्यासाठी स्वतंत्र आसन  व्यवस्था करण्यात आली असून परिसराचे सुशोभिकरणही करण्यात आले आहे.

शवदाहिनी उभारणी साठी श्री रिखभराज बाफना आणि श्री दिलीप चोपडा यांनी भक्कम आर्थिक सहयोग दिला आहे. तसेच या प्रकल्पासाठी महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री उदय टेकाळे, माजी स्थायी समिती सभापती अॅड शुचिता हाडा, महापौर भारतीताई सोनवणे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सहयोग मिळाला असल्याचे श्री. अमळकर यां नी नमूद केले

लवकरच छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन, आयुक्त सतिश कुळकणी यांच्या प्रमुख उपस्थितीत शवदाहिनीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. अधिकाधिक जळगावकर नागरिकांनी या सामाजिक उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.