केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित आधुनिक शवदाहिनीचे लोकार्पण, सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आवाहन

केशवस्मृती प्रतिष्ठानने आजवर जे विविध सेवाभावी उपक्रम राबविले आहेत, त्यातील माईल स्टोन ठरावा असा हा पर्यावरणपूरक उपक्रम असून कुणाच्याही धार्मिक भावना अजिबात न दुखावता येथे अंत्यसंस्कार करण्याची सर्व व्यवस्था आहे. बदलत्या काळाची गरज म्हणून समाजाने अशा नव्या परंपरांचा स्वीकार करण्याची आज गरज आहे. याबद्दल आयोजकांचे आभार मानतांनाच ज्यांच्या दातृत्वामुळे हा उपक्रम उभा राहू शकला त्यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कारण समाजातून असे दातृत्व समोर आले तर आपल्या जळगाव जिल्ह्यात अनेक लोकोपयोगी कामे उभी राहू शकतील आणि केशवस्मृती प्रतिष्ठानसारख्या संस्थांना अधिक कामाची प्रेरणा मिळू शकेल, अशी भावना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

जळगाव शहरातील नेरी नाका येथील वैकुंठधाममध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या आधुनिक शवदाहिनीचे ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते लोकार्पण झाले. शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रविवार, 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता हा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात पार पडला, त्यावेळी कळ दाबून ही शवदाहिनीचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराचे आ.सुरेश (राजूमामा) भोळे होते. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मंचावर मनपा महापौर भारतीताई सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, मनपातील विरोधी पक्ष नेता सुनिल महाजन, आयुक्त सतीश कुलकर्णी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर आणि वैकुंठ शवदाहिनी प्रकल्प प्रमुख नंदू अडवाणी होते.

यांचा झाला सत्कार

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत वृक्षाचे रोपटे देवून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. विशेष म्हणजे हे रोपटे नेरीनाका येथील वैकुंठधाम परिसरात लावण्यात येणार आहे. त्यानंतर केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे उभारण्यात आलेल्या शवदाहिनीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल देणगीदार – रिखभराज बाफना, दिलीप चोपडा, हरिष तोलानी, प्रमुख सहयोगी- स्थायी समितीच्या माजी सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, भालेराव प्रतिष्ठानचे स्व.राजू भालेराव यांचे बंधू शरद भालेराव, ललित राणे, निःशुल्क सेवेबद्दल मोहीत पाटील, सागर भावसार, कार्यरत अभियंता पृथ्वी मैनपुरी आणि कल्पेश श्रीश्रीमाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शवदाहिनी कार्यरत राहण्यासाठी सर्व जातीधर्मातील लोकांनी पुढे यावे – भरत अमळकर

प्रास्ताविकात केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी शवदाहिनीसाठी दाते रिखभराज बाफना, दिलीप चोपडा, तत्कालीन मनपा आयुक्त उदय टेकाळे आदींचा उल्लेख करीत ते म्हणाले की, बहुसंख्य शहरात पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी आहेत. जळगाव मात्र यात मागे होते, ती कसर भरून काढण्यासाठी सर्व अडचणी दूर करुन जळगावातसुद्धा आधुनिक शवदाहिनीची केशवस्मृतीने निर्मिती केली आहे. ही शवदाहिनी पुढे निरंतर किमान 10 वर्षे तरी सुरु राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्याचा उपयोग करुन घेण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी सर्व जातीधर्मातील लोकांनी पुढे यावे, असे आवाहन भरत अमळकर यांनी शहरवासियांना केले.

आधुनिक शवदाहिनीमुळे शहरात नागरी सुविधेत भर – आयुक्त

प्रत्येक धर्मात अंत्यसंस्काराच्या पद्धती विभिन्न आहेत. मात्र, परंपरागत अंत्यविधीसाठी लाकडाच्या वापरामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येण्याची गरज आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे साकारण्यात आलेल्या या आधुनिक शवदाहिनीचा जुन्या परंपरांना छेद देवून स्वीकार करावा. केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची योग्य काळजी घेतली जात आहे. या आधुनिक शवदाहिनीमुळे शहरात नागरी सुविधेत भर पडली असल्याचे गौरवोद्गार मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी काढले. यासारखे अनेक उपक्रम सामाजिक संस्थांकडून राबविण्यात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कारण, जळगाव हे ऐपत आणि दानत या दोन्ही गोष्टी असणारे गाव असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

100 लोकांच्या अंत्यविधीची जबाबदारी माझी : आ.सुरेश भोळे

अध्यक्षस्थानावरुन बोलतांना आ.सुरेश भोळे म्हणाले की, स्व.डॉ.अविनाश (दादा) आचार्य यांचे कार्य भरतदादा योग्य पद्धतीने पुढे नेत हा वटवृक्ष अधिक पल्लवीत करीत आहेत. भरतराज्यात आनंदाश्रम, आश्रय-माझे घर यांच्यासारखे अनेक सामाजिक प्रकल्प सुरु आहेत. त्यात या प्रकल्पाची भर पडली असून याद्वारे पर्यावरणास मदत होणार आहे. तसेच अंत्यविधीसाठी बीपीएल कार्डधारकांना सवलत मिळण्यासाठी मदत होऊ शकते का, याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे सांगत आ.भोळे यांनी गरजू 100 लोकांची अंत्यविधीची जबाबदारी घेतो, असे त्यांनी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘लोकसहभागातून आपला विकास’ या संकल्पनेनुसार केशवस्मृती प्रतिष्ठानने हा प्रकल्प यशस्वीपणे उभा केला आहे. तसेच शहरात रस्ता, अमृत योजनेमुळे नागरिक त्रस्त असून या समस्या सोडविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. यात पालमंत्र्यांनी मदत करावी, असे आवाहन आ.भोळे यांनी मंचावरुन केले. तसेच येत्या दोन महिन्यात शहरात 70 कोटींची विकास कामे सुरु होणार असून याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. आयुष्य हे एकप्रकारे पुस्तक असून त्यातील पहिले व शेवटचे पान वगळता अन्य कोरी पाने आपल्या कार्यामुळे भरायची असतात, असे सांगून या प्रकल्पात दानशूर व्यक्तींनी मदत करावी. तसेच शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी 20-25 जणांची कमिटी नेमून प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहनही आ.भोळे यांनी जळगावकरांना केले.

यावेळी आवाहन करण्यात आल्यानुसार जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेतर्फे दरवर्षी 11 निराधार, बेवारस मृतांवर 11 वर्षांसाठी अंत्यविधीचा खर्च करण्याची तयारी दर्शविण्यात आली.

मान्यवरांनी केली शवदाहिनीची प्रत्यक्ष पाहणी

या सोहळ्यापूर्वी पालकमंत्र्यासह सर्व मान्यवरांनी शहरातील नेरी नाका वैकुंठधाम येथे जावून या शवदाहिनीची प्रत्यक्ष पाहणी केली.

शवदाहिनीचे प्रकल्प प्रमुख नंदू अडवाणी यांनी लोकसहभागातून स्वयंसहायता गटाद्वारे हे काम येथे चालणार असून त्यासाठी समाजातील सर्वांनी मदतीचा हात द्यावा, असे सांगितले. तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. सूत्रसंचालन केशवस्मृती प्रतिष्ठानच्या संचालिता मनिषा खडके आणि जनसंपर्क अधिकारी सागर येवले यांनी केले. या लोकार्पण सोहळ्यास शहरातील विविध मान्यवर, मनपातील अधिकारी, नगरसेवक यांच्यासह केशवस्मृती परिवारातील सदस्य उपस्थित होते.