
जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या केशवस्मृती प्रतिष्ठानचा ३० वा वर्धापन दिन दि ९ मे रोजी साजरा करण्यात आला. यावर्षी लॉकडाऊन व सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मर्यादा असल्याने, या वर्धापन दिनाचे औचित्य साधत गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या कालखंडात सातत्याने जनतेला सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांचा सन्मान करण्याचे ठरविले. देशभरात सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. अनेक ओद्योगिक आस्थापने, व्यावसायिक उपक्रम बंद ठेवण्यात आले होते मात्र त्याचवेळी पोलिस, बँक कर्मचारी व पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी हे अव्याहतपणे सेवा नागरिकांना देत होते. कोरोनाचा कालखंड असतांना देखील या योद्ध्यांनी खऱ्या अर्थाने नागरिकांना सेवा दिली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जळगाव शहरातील सर्व पोलिस स्टेशन मधील कार्यरत प्रमुख अधिकारी व कर्मचारी, पेट्रोल पंपावर सेवा देणारे कर्मचारी, यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कामकाजाचे कौतुक करत सन्मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची केशवस्मृतीच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पोलिस दलाने केलेल्या कामाचे कौतुक केले.
